Breaking

Friday, February 6, 2026

लाडक्या बहीणींसाठी मोठी अपडेट ई-केवायसी दुरुस्तीची शेवटची संधी...


आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये एकत्रित मिळणार

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यापूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या प्रक्रियेदरम्यान काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने लाभार्थ्यांना पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले की, अनेक पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन पोर्टलद्वारे ई-केवायसी माहितीमध्ये सुधारणा करण्याची सुविधा 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थीना योजनेचा लाभ मिळावा, हीच महिला व बालविकास विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना काही महिलांकडून 'कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा कंत्राटी कर्मचारी आहे का, तसेच निवृत्तीनंतर पेन्शन घेत आहे का' या बाबतीत चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे या लाभार्थी महिलांसाठीच ई-केवायसी दुरुस्तीची ही विशेष संधी देण्यात आली आहे. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांनी निश्चित मुदतीपूर्वी माहिती दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते, त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये एकत्रित मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील प्रचारसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा ही त्यांनी केली होती.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणांमुळे थांबले आहेत, त्यांना काळजी करण्याची गरज नाही.अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र महिलांच्या खात्यात 3 महिन्यांचे पैसे एकाच वेळी जमा होतील.

तसेच त्यांनी बहिणींना 2100 रूपये देण्याचे दिलेले आश्वासनही लवकरच पूर्ण होणार असल्याचे संकेत दिले. लाडकी बहीण ही माझी अत्यंत आवडती योजना आहे. माझ्या आईच्या प्रेरणेतून ही संकल्पना जन्माला आली. मला माझ्या राज्यातील बहिणींना केवळ मदत करायची नाही, तर त्यांना लखपती होताना पाहायचे आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या सभेत बोलताना शिंदेंनी विरोधकांवरही निशाणा ही साधला होता. "आम्ही बहिणींना आर्थिक बळ देत आहोत, पण काही लोक केवळ टीका करण्याचे काम करत आहेत. तुम्ही स्वतः काही दिले नाही आणि आम्ही देतोय तर त्यावरही तुमचे आक्षेप आहेत," अशा शब्दांत त्यांनी टोला ही लगावला. यासोबतच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक समिती गठीत करण्यात आली असून, अहवाल प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाईल, असेही त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केले आहे.