मावळ तालुका प्रतिनिधी :- मंगेश आखाडे
थूगावातील माजी ग्रामपंचायत सदस्य द्वारका किसन तरस तसेच कमल प्रसाद तरस यांनी आपल्या शेताच्या कडेला एक जखमी अवस्थेत धावत असलेले भेकर पाहिले. त्याच्या मागे जंगली कुत्रे लागले होते, त्यामुळे त्याचा जीव धोक्यात होता. या परिस्थितीत त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या भेकराला वाचवले आणि त्याला जवळील गायीच्या गोठ्यात नेऊन प्राथमिक उपचार दिले.यानंतर त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांचे बंधू रामनाथ गराडे यांना याबाबत माहिती दिली. पुढे, निलेश गराडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांना फोनद्वारे या घटनेची माहिती दिली.वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भेकराच्या रेस्क्यूसाठी वन परिमंडळ अधिकारी श्रीमती दया डोमे, वनरक्षक श्रीमती अशा मुंडे, वनसेवक विशाल सुतार तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य घटनास्थळी हजर झाले.भेकराची प्राथमिक वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील भुगाव रेस्क्यू सेंटरला पाठविण्यात आले. याबाबत संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी माहिती देताना सांगितले की, जर कुठेही वन्यजीव आढळल्यास त्वरित टोल-फ्री क्रमांक 1926 किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या 9822555004 या नंबरवर संपर्क साधावाया प्रसंगी शिवसेना उपविभागप्रमुख किसन तरस, विद्यमान सरपंच प्रकाश महादू सावंत, उपसरपंच राहुल शांताराम पोटफोडे, माजी सदस्य दुर्गा किसन तरस यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मदतीचा हातभार लावला. या घटनेने गावकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात आले असून, या महिलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


