विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरती आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन स्वतःला घडविले पाहिजे : सौ. हेमलता तावरे
मुख्य संपादक : संतोष पांढरे
समाजामध्ये माणूस म्हणून घडणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांमध्ये लोकहित, समाजहित व देश हिताची भावना निर्माण होणे गरजेचे आहे व त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरती आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन स्वतःला घडविले पाहिजे असे मत महाराष्ट्र परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक बारामती विभाग सौ. हेमलता तावरे यांनी व्यक्त केले. माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमांमध्ये बोलत होत्या.यावेळी या कार्यक्रमासाठी माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे. संस्थेचे गटनिदेशक संतोष सपकळ, सचिन देवकते, निवास काळे, प्रमुख लिपिक रुपनवर मॅडम व निदेशक कर्मचारी उपस्थित होते.पुढे तावरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना स्वतःची व इतरांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे अनवधानाने अपघात झाल्यास या अपघाताच्या झळा संबंधित अपघात ग्रस्त व्यक्तीबरोबर त्याच्या संपूर्ण परिवाराला सोसाव्या लागतात व यापुढे जाऊन अपघातामध्ये एखादी व्यक्ती मरण पावल्यास संपूर्ण एक कुटुंब उध्वस्त होते यासाठी आपण गाडी चालवताना योग्य काळजी घेणे व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी देखील गाडी चालवताना या नियमांचे व कायद्याचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे.
यावेळी माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे व मोटार वाहन निरीक्षक हेमलता तावरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप केले. तसेच स.पो.नि. लोखंडे यांनी मौजे लोणी भाकर येथे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीराच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी पुढील काळामध्ये देखील अशाच पद्धतीने समाज हिताची व देश सेवेची कामे करून राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान द्यावे असे सांगितले.
त्याचबरोबर संस्थेचे गटनिदेशक सचिन देवकते यांनी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असणाऱ्या १८ वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाहन परवाना मिळावा यासाठी विशेष मोहीम घेऊन संस्था स्तरावर शिबिरे आयोजित करण्याविषयी तावरे यांना सुचविले तसेच राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम व मार्गदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य श्री अवधूत जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी संतोष सपकळ सर, श्रीनिवास काळे सर,मोहन जाधव सर,अमोल खाडे सर, अविनाश नाईक सर, सुभाष गाडे सर, निखिल बागल सर, जमीर शेख सर, डोंबाळे सर, जराड सर इत्यादी यांनी केले होते.


