Breaking

Monday, September 8, 2025

त्रिमूर्ती विद्यालयाला निर्भया पथकाची भेट : विद्यार्थिनींना दिला आत्मसंरक्षणाचा धडा


प्रतिनिधी – अक्षय वरकड

करमाळा तालुका – ग्रामीण भागातील मुली व महिलांना सक्षम बनविणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि समाजातील छेडछाड व अत्याचाराला आळा बसविणे या उद्देशाने कार्यरत असलेल्या निर्भया पथकाने आज दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी करमाळा तालुक्यातील टाकळी येथील त्रिमूर्ती विद्यालय तसेच रामराजे कोकाटे विद्यालयास भेट दिली.

या भेटीत निर्भया पथकाचे श्री. गुटाळ साहेब व श्री. पवार साहेब यांनी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्मसंरक्षणासाठी कराटेसारख्या प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली. समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई, शाळा-महाविद्यालयीन परिसरात दृष्यमान पोलीसिंग, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत माहिती दिली.

राज्यातील महिला सुरक्षिततेसाठी तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून २०१६ साली स्थापन झालेले हे पथक आज विविध ठिकाणी जनजागृती करत असून, १०३ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून महिलांना तत्काळ मदत मिळू शकते, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास कोकाटे व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर यांनी निर्भया पथकाच्या टीमचे आभार मानले.

या उपक्रमामुळे मुली व महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन समाजातील अत्याचारांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.