Breaking

Tuesday, December 30, 2025

स्वतःची जबाबदारी स्वीकारणं हाच खरा स्वातंत्र्याचा अर्थ— केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांचे प्रतिपादन


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

संविधानाने नागरिकांना जसे हक्क व अधिकार दिले आहेत, तसेच कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. कर्तव्यापासून मागे सरकून केवळ हक्कांसाठी पुढे सरसावणे योग्य नसून, कर्तव्य पार पाडण्यासाठीही तितक्याच क्षमतेने पुढे येणे गरजेचे आहे. स्वतःची जबाबदारी स्वीकारणं हाच खरा स्वातंत्र्याचा अर्थ आहे, असे मत उपळाई बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केले.

ते श्री नंदिकेश्वर विद्यालय, उपळाई बुद्रुक येथे आयोजित शिक्षण परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आत्मसन्मानाच्या मुखवट्यामुळे समाजाला होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक मुलाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. माणूस हा प्रेक्षक नसून स्वतःच्या आयुष्याचा निर्माता आहे, हे शिक्षणातून समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी पांडुरंग शिंदे यांनी सकारात्मक शिस्त या विषयावर मार्गदर्शन करताना सकारात्मक शिस्तीची नऊ मूलतत्त्वे, मुलांचे सहकार्य मिळवण्याच्या पायऱ्या व वर्तन समस्या सोडवण्याच्या पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.नीलिमा थोरात यांनी खान अकादमी बाबत सखोल माहिती देत त्याचा अध्यापनातील उपयोग स्पष्ट केला.पोर्टलवरील विविध शैक्षणिक माहिती संदर्भात धनाजी घाडगे यांनी सकारात्मक विचार मांडले.तसेच संविधान जागृती विनोबा साठ दिवस उपक्रम याविषयी ज्येष्ठ शिक्षक विठोबा गाडेकर यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंत राऊत होते.प्रास्ताविक वैजनाथ मोगल यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय नागटिळक यांनी मानले.

केंद्रातील सर्व शिक्षक वेळेत उपस्थित होते.सदरची शिक्षण परिषद यशस्वीरीत्या पार पडली.