पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक
सासवड येथील म. ए. सो. वाघिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. पुरंदर-हवेलीचे माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या विशेष सहकार्याने ही सहल घडवून आणण्यात आली.सहलीत ३९ विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक आणि महाविद्यालयीन कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना विधान भवन व मंत्रालय येथे नेण्यात आले. त्याठिकाणी विधिमंडळ आणि विविध प्रशासकीय विभागांचे कामकाज कसे चालते, याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळाली
यावेळी आमदार विजय बापू शिवतारे यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांना प्रशासकीय व्यवस्थेचा अनुभव यावा यासाठीच या सहलीचे नियोजन केले होते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य घडवू शकतात. त्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्राविषयी आणि प्रशासनाच्या कामकाजाविषयी माहिती असणे गरजेचे आहे."
विधिमंडळ आणि मंत्रालयाच्या कामकाजाची प्रक्रिया जवळून पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेबाबत कुतूहल निर्माण झाले असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे त्यांना राज्याच्या निर्णय प्रक्रियेशी अधिक जवळून ओळख होण्यास मदत झाली.



