Breaking

Tuesday, March 11, 2025

वडकी गावात संतपरंपरेच्या सेवेत अन्नप्रसादाचे अनमोल योगदान

 

हवेली तालुका प्रतिनिधी : रविंद्र मोडक

वडकी, ता.हवेली जि. पुणे सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले वडकी गाव हे संतपरंपरेच्या वारकरी संप्रदायातील विविध धार्मिक सोहळे मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. या परंपरेला पुढे नेत संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्याच्या 375 व्या वर्धापन दिनानिमित्त, वडकी ग्रामस्थ आणि संत सोपान काका दिंडी क्रमांक आठ वडकी, यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नप्रसाद सेवा आयोजित करण्यात आली आहे.वारकरी संप्रदायामध्ये अन्नदान हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग वडकी गावातून जातो, यावेळी ग्रामस्थ भाविकांसाठी अन्नदान सेवा आयोजित करून आपले योगदान देतात. याच परंपरेचा वारसा जपत, संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यातही अन्नदानाची सेवा करण्यात येणार आहे.या सेवेसाठी भाविकांनी बाजरीच्या भाकरी आणि आमटीसाठी आर्थिक मदत (किमान 100 रुपये किंवा इच्छेनुसार अधिक) द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त, देशभरातून लाखो वारकरी देहू येथे येतात. या पवित्र सोहळ्यात कोणत्याही भाविकाला अन्नाची कमतरता भासू नये, यासाठी वडकी ग्रामस्थांनी अन्न व आर्थिक मदत गोळा करण्याचा संकल्प केला आहे.

भाविकांना सहभागाचे आवाहन वडकी ग्रामस्थ आणि संत सोपान काका दिंडी क्रमांक आठ, वडकी ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व भाविकांना या पुण्याच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. "अन्न हेच पूर्णब्रह्म" या सेवाभावी भावनेतून सहभागी होणाऱ्या सर्व भक्तांचे ग्रामस्थांतर्फे आभार मानण्यात येत आहेत.