पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक
दि. 19 मे 2025 रोजी भारताच्या ऐतिहासिक ‘सिंदूर ऑपरेशन’च्या विजय दिनानिमित्त जेजुरी शहरात राष्ट्रप्रेमाने भारलेला आणि उत्साहवर्धक कार्यक्रम पार पडला. पहलगाम येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 27 भारतीय वीरांना यावेळी कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या देशभक्तिपूर्ण कार्यक्रमास जेजुरीतील सर्वपक्षीय प्रतिनिधी, नागरिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातून भव्य विजयी रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमात माजी कर्नल, माजी सुभेदार, माजी हवालदार आणि अनेक माजी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले की, “आजही देशासाठी लढायला तयार आहोत.” त्यांच्या बोलण्यातून प्रकटलेली देशसेवेची तळमळ उपस्थितांच्या हृदयाला भिडली.या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत गात आणि "भारत माता की जय", "जय जवान, जय किसान" या गगनभेदी घोषणांनी झाला.आजचा दिवस जेजुरी शहरासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला, ज्यामध्ये राष्ट्रभक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य झाले.



