पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक
मागील काही दिवसांपासून निरा व भीमा खोऱ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीपात्रांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, सध्या निरा नदीपात्रात लाटे येथे २६,५२५ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. यामुळे भीमा नदीपात्रातील को.प. बंधाऱ्यांमध्ये आधीपासूनच असलेला पाणीसाठा वाढत असून, त्यावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद यांना पत्र पाठवून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याचे निर्देश दिले आहेत.
उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगवले यांनी सांगितले की, नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करावं, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




