Breaking

Tuesday, May 20, 2025

पंढरपूरच्या आषाढी एकादशी पायीवारीची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद


"जय जय राम कृष्ण हरी", "ज्ञानोबा तुकाराम", "पुंडलीक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी आसमंत दुमदुमवणारी ही वारी ची परंपरा आगामी पिढ्यांसाठीही प्रेरणास्थान 

पुणे प्रतिनिधी – रवींद्र मोडक

विठ्ठल भक्त आणि वारकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी आहे. भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी पायवारीची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.ही केवळ पायी यात्रा नसून, शेकडो वर्षांपासून अखंडित चालत आलेली एक जिवंत भक्तिपरंपरा आहे. वारकरी संप्रदायाची ही परंपरा म्हणजे श्रद्धा, समर्पण, शिस्त, भक्ती आणि सामाजिक समतेचे मूर्त रूप होय.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत जनाबाई यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या दरवर्षी देवाची आळंदी, देहू व अन्य भागांतून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. लाखो वारकरी टाळ, मृदुंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात ही यात्रा पूर्ण करतात. ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचा जगाला दिलेली एक अनोखी भेट आहे.या परंपरेतून अनेक कीर्तनकार, प्रवचनकार व समाजप्रबोधन करणारे संत घडले, ज्यांनी भक्तीबरोबरच नीतिमूल्ये, समता आणि सेवा यांचे धडे समाजाला दिले. संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ यांसारख्या थोर संतांनी कीर्तन, अभंग व प्रवचनांच्या माध्यमातून लोककल्याणाचा संदेश दिला.

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून या परंपरेची नोंद घेतली जाणे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि आपल्या भक्तीसंस्कृतीसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. यामुळे पंढरपूरच्या विठोबाची कीर्ती आणि वारकरी संप्रदायाची ताकद आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.

"जय जय राम कृष्ण हरि", "ज्ञानोबा तुकाराम", "पुंडलीक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी आसमंत दुमदुमवणारी ही परंपरा आगामी पिढ्यांसाठीही प्रेरणास्थान राहील, यात शंका नाही.

         

         वारीचं वैभव गगनात पोहोचले,

         वारीचं वैभव गगनात पोहोचले

         विठ्ठलाच्या नामानं जग जागे झाले.

         पायी चालती लाखो भगवे वारी करी

टाळ-मृदंगाचा नाद जिवंत अंतरी

शिस्त-भक्तीचा सागर पंढरीत वाहे

संतांच्या वचनांनी जनमानस जागे

तुका म्हणे — हरिपाठ विसरू नका रे

ज्ञानोबा म्हणती — ओवी गा रोजचे

नामाच्या जोरावर जग हलवले

वारीचं वैभव गगनात पोहोचले

 मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)