मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच समृद्ध महाराष्ट्राचा पाया
"आजचा विद्यार्थी वर्ग हा समृद्ध महाराष्ट्राचे भवितव्य आहे. विद्यार्थ्यांनी चिकित्सक, सर्जनशील आणि संवेदनशील नागरिक बनावे यासाठी 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना शिक्षणातून रुजवली पाहिजे," असे प्रतिपादन उपळाई केंद्रातील शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी केले.
उपळाई येथील या परिषदेत बोलताना ते म्हणाले, "शिक्षण हे व्यक्ती विकासाचे प्रभावी साधन आहे. ‘परख’ च्या माध्यमातून आपण शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत, हे समजते. शिक्षकांचे अध्यापन हे अध्ययन निष्पत्ती साध्य करणारे असावे. मूल्यांकन हे वस्तुनिष्ठ असावे आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे."
काळे पुढे म्हणाले, "शिक्षकांच्या चेहऱ्यावर काहीतरी नवीन शिकवल्याचा आनंद दिसावा आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन शिकल्याचा समाधान असावे, अशी अध्यापन प्रक्रिया अपेक्षित आहे." शिक्षण हे केवळ ज्ञान नव्हे, मूल्यांचा संस्कार आहे. शिक्षणातून संवेदनशील नागरिक घडावेत.परिषदेच्या कार्यक्रमात पांडुरंग शिंदे यांनी ‘परख’ च्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी अध्ययन निष्पत्तीवर केंद्रित अभ्यास मांडला. मनीषा लोंढे यांनी कृती आराखडा तयार करून शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापराबद्दल मार्गदर्शन केले.
विठोबा गाडेकर यांनी प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्य सादर करत आराखड्याची माहिती दिली. चर्चासत्रात हनुमंत कापरे, गणपत दाडे, सूर्यकांत उबाळे यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहाजी क्षीरसागर यांनी केले, सूत्रसंचालन विठोबा गाडेकर यांनी केले तर आभार नानासाहेब ढेरे यांनी मानले.



