पोलीस, RCP, व RAF पथकांचा समावेश ;कायदा सुव्यवस्थेचा निर्धार दृढ
मुख्य संपादक – संतोष पांढरे (मोडनिंब)
टेंभुर्णी येथे १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० ते १२:०५ या कालावधीत आगामी सण-उत्सव व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य पोलीस रूट मार्च पार पडला. कायदा-सुव्यवस्थेचा संपूर्ण अंमल सुनिश्चित करण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला.
या रूट मार्चमध्ये संभाव्य सामाजिक अस्थिरता, तसेच धार्मिक वा जातीय संघर्ष उद्भवल्यास तत्काळ व प्रभावी कारवाई करता यावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. यामध्ये टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे ५ अधिकारी व २५ अंमलदार, पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण कडील RCP पथकातील १७ अंमलदार आणि तेलंगणा येथून आलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (RAF) १ कमांडंट, २ पोलीस निरीक्षक आणि ३३ जवानांचा समावेश होता.
रूट मार्चची सुरुवात टेंभुर्णी पोलीस ठाण्यापासून झाली. त्यानंतर कुर्डूवाडी चौक, सराफ कट्टा, महादेव गल्ली, शुक्रवार पेठ, वेश, महादेव मंदिर, करमाळा चौक, बेंबळे चौक, एस.टी. स्टँड मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यावर समाप्ती झाली.
या भव्य रूट मार्चमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा निर्धार दृढ झाल्याचे चित्र दिसून आले असून नागरिकांत सकारात्मक प्रतिसाद व सुरक्षिततेबाबतचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.



