गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार, मार्गदर्शन व चार्ट वितरण
वरवडे प्रतिनिधी- समीर मुलाणी
मुख्य संपादक : संतोष पांढरे ( मोडनिंब )
वरवडे येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पांडुरंग (अण्णा) पाटील फाउंडेशन व स्कॉलर गुरु अकॅडमीच्या वतीने महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून त्यांच्या अभ्यासातील जिद्द अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
स्कॉलर गुरु अकॅडमीच्या संचालिका सौ. पल्लवी सूर्यकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व समजावून सांगितले.“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल यांसारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे प्रगती साधली पाहिजे. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी अभ्यास कसा करावा, सातत्य कसे ठेवावे व यश संपादनाची गुरुकिल्ली काय आहे याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी टिप्स दिल्या.
विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक नियोजनबद्ध व्हावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त चार्ट वाटप करण्यात आले. या चार्टमुळे विषयांची मांडणी सोपी होईल व तयारी अधिक प्रभावी होईल, असे आयोजकांनी सांगितले.
या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ऍड. मा. बाळासाहेब पाटील, विद्यालयाचे स्थानिक कमिटी सदस्य युवराज पांडुरंग पाटील, युवा उद्योजक सूर्यकांत युवराज पाटील, भाई एस. एम. पाटील विचार मंचाचे अध्यक्ष अजित पाटील, मा. शिवाजी पाटील, मा. भालचंद्र पाटील, मोरे सर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ व तरुण वर्ग यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अशा प्रयत्नांमुळे भविष्यात वरवडे व परिसरातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.





