Breaking

Sunday, August 24, 2025

मोडनिंब येथे शनिअमावस्या निमित्त महामस्तकाभिषेकाचा भव्य सोहळा


चतुर्मुख शनी ग्रह अरिष्ट निवारक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; भगवान शांतिनाथ विधान व महाआरतीने भक्तिमय वातावरण.

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

शनिअमावस्या निमित्ताने मोडनिंब येथील महाराष्ट्रातील प्रथम चतुर्मुख शनी ग्रह अरिष्ट निवारक श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर, अतिशय क्षेत्र येथे शनिवारी दि.२३ ऑगस्ट २०२५ रोजी धार्मिक वातावरणात महामस्तकाभिषेक व भगवान शांतिनाथ विधानाचा भव्य सोहळा उत्साहात संपन्न झाला.

रिद्धी–सिद्धी मंत्रोच्चारात मूर्तीचा महामस्तकाभिषेक होत असताना उपस्थित श्रावक-श्राविकांमध्ये प्रचंड भाविकता दिसून आली. शांत संगीत, मंगलध्वनी व धार्मिक स्तोत्रांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.या सोहळ्याकरिता पुणे, बारामती, टेंभुर्णी, करकंब, पंढरपूर, फलटण, वेळापूर, उस्मानाबाद तसेच सोलापूर भागातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. दूरवरून आलेल्या श्रावक-श्राविकांनी यावेळी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून धार्मिक सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.कार्यक्रमानंतर सर्वांसाठी महाप्रसाद व पाखी ठेवण्यात आली होती. सौ. मधुरा व श्री. अमोल अशोक वागजकर यांनी या सेवेसाठी पुढाकार घेतला.

सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. विशाल मेहता, उपाध्यक्ष गुरसाळकर, श्री. अजित खडके, श्री. दिनेश काका शहा, वैभव मेहता, रत्नदीप मेहता, सुनील पुरवत, संकेत पुरवत, अजित गुमते, सौ. वृषाली मेहता, सौ. पुनम गांधी, सौ. दीपा शहा आदींनी परिश्रम घेतले. संपूर्ण मंदिर व परिसर फुलांच्या तोरणांनी सजवण्यात आला होता.सायंकाळी भक्तिमय वातावरणात महाआरती घेण्यात आली. 

शेकडो भाविकांनी दीपप्रज्वलन करून भगवान मुनिसुव्रतनाथ व शांतिनाथ प्रभूंना वंदन केले. अखंड घोषवाक्ये व स्तोत्र पठणाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.“अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात श्रद्धा, संस्कार व एकात्मतेची भावना दृढ होते,” असे मत उपस्थित श्रद्धाळूंनी व्यक्त केले.