Breaking

Thursday, September 18, 2025

मोडनिंब येथे भव्य जैन धार्मिक सोहळा उत्साहात पार


१००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात महामस्तकाभिषेक, विधान पूजन व आरतीसाठी भाविकांची गर्दी

हे विधान आता सर्व भाविकांसाठी दर महिन्यातून दोन दिवस घेण्यात येणार असून दुसऱ्या व चौथ्या रविवारी याचा सर्व  समाज बांधवांनी धर्म लाभ घ्यावा असे आवाहन विशाल मेहता संस्थेचे अध्यक्ष यांनी केले

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

महाराष्ट्रातील प्रथमच चतुर्मुख शनी ग्रह अरिष्ट निवारक म्हणून ख्याती लाभलेल्या भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर, अतिशय क्षेत्र मोडनिंब येथे रविवारी (१४ सप्टेंबर) भव्य धार्मिक सोहळा पार पडला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालेल्या विविध पूजन, अभिषेक व आरती कार्यक्रमांना मोडनिंब व परिसरातील जैन बांधवांसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सोहळ्याची सुरुवात पहाटे ८.०० वाजता महामस्तकाभिषेकाने झाली. भगवान मुनिसुव्रतनाथांच्या प्रतिमांवर शुद्ध जलाभिषेकाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. सकाळी १०.०० वाजता मुनिसुव्रतनाथ विधान पं. सुधीरजी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. हे विधान मुनिपुंगव १०८ सुधासागरजी महाराज रचित असून, संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आले होते.१०८ रिद्धी सिद्दी मंत्राद्वारे पूजन व अभिषेक पं सुधीरजी शास्त्री यांच्याद्वारे झाले.बाळू गुरसाळकर, साहिल मेहता ,रत्नदीप मेहता, वैभव मेहता व मेहता परिवाराच्या हस्ते पुजा करण्यात आली.

सायंकाळी ७.०० वाजता आरती झाल्यानंतर मंदिर परिसरात भजन, प्रवचन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम रंगला. या प्रसंगी विधानकर्ते व अल्पोपहार दाते अभिनंदन विजयकुमार मेहता (मोडनिंब) व समस्त मेहता(परितेकर) परिवाराचे योगदान विशेष राहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री १००८ पद्मप्रभ दिगंबर जैन चॅरिटेबल संस्था तसेच मंदिर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुयोग्य नियोजन केले होते.

संस्थेचे अध्यक्ष विशाल मेहता,उपाध्यक्ष अरविंद गुरसाळकर,अजित खडके,बाळू गुरसाळकर, साहिल मेहता,रत्नदीप मेहता,वैभव मेहता व सुनिल पुरवत यांच्यासह सर्व पदाधिकारी व स्थानिक भक्तांनी परिश्रम घेतले. परिसरातील महिला, पुरुष व बालभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण दिले.या भव्य सोहळ्यामुळे मोडनिंब आणि आसपासच्या भागात धार्मिक व सांस्कृतिक उर्जा संचारली असून, महाराष्ट्रातील जैन समाजाच्या श्रद्धेचे व ऐक्याचे हे उत्कृष्ट दर्शन घडले.