जुने मित्र, गोड आठवणी आणि ‘पसायदान’च्या स्वरांनी भरलेला अविस्मरणीय दिवस!
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
मोडनिंब येथील श्री उमा विद्यालयात “बॅच 1980” चा गेट-टुगेदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल 45 वर्षांनंतर एकत्र जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत आनंदाचा वर्षाव केला.
या गेट-टुगेदरचे सुयोग्य व सुंदर नियोजन सारंग शहा आणि मंजू पुरवत यांनी केले होते. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित पार पडला. सर्वांमध्ये अनेक दिवसांपासून असलेली “एकमेकांना भेटण्याची आतुरता” अखेर या भेटीत पूर्ण झाली.
रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला हा सोहळा दुपारी साडेचार वाजेपर्यंत चालला. या भेटीला सुमारे 35 ते 40 माजी विद्यार्थी उपस्थित होते. मुंबई, सोलापूर, पंढरपूर, नातेपुते, अकलूज, पुणे, कलबुर्गी, खंडाळी, बारामती अशा विविध ठिकाणांहून माजी विद्यार्थी खास या प्रसंगी जमले होते.
सांगता सोहळ्यात सर्वांनी एकत्र येऊन भावपूर्ण ‘पसायदान’ म्हटले. त्यानंतर शाळेच्या आवारात राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा संदेश दिला.तद्नंतर गेट-टुगेदरच्या निमित्ताने काहींच्या इच्छेनुसार सर्व मित्रांनी आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा देत प्रिय मोडनिंब गावाचा फेरफटका मारला. गावातील ओळखीचे रस्ते, शाळेच्या अंगणातील गप्पा आणि जुने कोपरे पुन्हा एकदा त्या सुवर्णक्षणांच्या आठवणीत रंगून गेले.सरतेशेवटी सर्वांनी पुन्हा ‘ओंकार पॅलेस’ हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा आस्वाद घेत गेट-टुगेदरची सांगता केली.कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व माजी विद्यार्थ्यांनी “अशा गोड भेटी दरवर्षी आयोजित कराव्यात” असा निर्धार व्यक्त करत पुढील भेटीचे आश्वासन दिले.




