२३३ लाभार्थ्यांचे हप्ते थांबले, १०९ घरकुल नाकारले; अखेर लेखी हमीपत्रानंतर आंदोलनाला/उपोषणाला विश्रांती
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना न्याय मिळावा, थांबवलेले हप्ते तात्काळ सोडावेत आणि पात्र नागरिकांना घरकुलाचा हक्क मिळावा या मागण्यांसाठी “ग्रामदैवत श्री वेताळ परिवार, मोडनिंब” तर्फे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.या उपोषणाचे नेतृत्व प्रकाश (आण्णा) गिड्डे, ऋषिकेश कोठावळे आणि अनिल अप्पा शिंदे तसेच उपोषणात सहभागी असलेले कुंभार गुरूजी, राजू खडके, शंकर कोठावळे, धनाजी लादे, चंद्रकांत आबा गिड्डे, दत्ता जाडकर, वैभव भांगे, सुरेश जाडकर, जयवंत ओहोळ, महादेव थिटे, बंडू तोडकरी, सुजित शिंदे तसेच समस्त वेताळ परिवार यांनी केले. २३३ लाभार्थ्यांचे हप्ते थांबवणे आणि १०९ घरकुल नाकारणे या अन्यायकारक निर्णयाविरोधात गावात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीकडे आणि प्रशासनाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही तोडगा न निघाल्याने अखेर वेताळ परिवाराने उपोषणाचा मार्ग अवलंबला.

या आंदोलनाला ग्रामस्थांचा आणि विविध सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा लाभला. दररोज नागरिक उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्यांना नैतिक आधार देत होते. “जनतेचा हक्क मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही,” असा ठाम निर्धार प्रकाश (आण्णा) गिड्डे यांनी या काळात व्यक्त केला होता.
तथापि, तणावानंतर प्रशासनाने पुढाकार घेत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. अखेर दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी वेताळ परिवाराला लेखी हमीपत्र दिले, आणि त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
या पत्रात पंचायत प्रशासनाने मागण्या मान्य करत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.ग्रामपंचायत मोडनिंब अंतर्गत 233 लाभार्थ्यांना पहिला हप्ता मागणी केलेची खात्री करून 491 लाभार्थी मंजूर यादीपैकी 182 लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला आहे. एकूण 309 लाभार्थ्यांना पहिला हप्ता देणे बाकी आहे. त्यांना ग्रामपंचायत कडून कागदपत्राची पूर्तता पूर्ण केल्यानंतर पाया खोदाईची अट लागू होणार नाही. याची दक्षता घेत आहोत. याची ही परवानगी माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्या परवानगीने दुसऱ्या हप्त्यासाठीही घेण्यात येईल.तसेच १०९ लाभार्थ्यांच्या पात्रतेची फेर तपासणी करून १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.तसेच, पूर्वीच्या कामांमध्ये झालेल्या संभाव्य अनियमिततेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आणि पारदर्शकतेने योजना राबविण्याचेही प्रशासनाने लेखी वचन दिले आहे.या लेखी हमीपत्रावर ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सहाय्यक तसेच पंचायत समिती कुर्डवाडीचे विस्तार अधिकारी (सा)
यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वेताळ परिवाराने याबाबत समाधान व्यक्त करत, “शासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही आंदोलन मागे घेतले आहे; परंतु न्याय न मिळाल्यास पुन्हा संघर्ष उभारू,” असा इशाराही दिला आहे.वेताळ परिवाराच्या ठिय्या आंदोलनामुळे व उपोषणामुळे काही दिवस मोडनिंब गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र आत्ता सध्या तरी तोडगा निघाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हमीपत्रानुसार १० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशासन आपले लेखी आश्वासन कितपत पाळते ते स्पष्ट होणार आहे.