Breaking

Saturday, October 4, 2025

पूरग्रस्तांच्या अश्रूंना दिलासा — पांडुरंग (आण्णा) पाटील फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम


सौ.पल्लवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली किराणा, औषधे आणि ब्लॅंकेटचे वाटप; समाजासाठी कर्तव्य बजावल्याचा अभिमान व्यक्त

मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या गावांमध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली, शेतजमिनी वाहून गेल्या आणि आरोग्य सेवांवर परिणाम झाला. या संकटात हातभार लावण्यासाठी ‘पांडुरंग (आण्णा) पाटील फाउंडेशन’ आणि मित्रपरिवार यांनी धाव घेतली.

गेल्या काही दिवसांपासून फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्त भागांमध्ये किराणा किट, जीवनावश्यक वस्तू आणि ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पल्लवी सूर्यकांत पाटील यांनी केले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या गरजा ओळखून तातडीने मदत पोहोचवली.

पूरामुळे प्रभावित गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याचे लक्षात आल्यानंतर फाउंडेशनने त्वरित पाऊल उचलले. त्यांनी विविध प्रकारची औषधे, गोळ्या आणि इंजेक्शन किट उपलब्ध करून दिल्यामुळे स्थानिक आरोग्यसेवेला दिलासा मिळाला. उपस्थित डॉक्टरांनी फाउंडेशनच्या या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी बोलताना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पल्लवी पाटील म्हणाल्या,

“ही मदत आमच्यासाठी सामाजिक कार्य नव्हे तर आमचे कर्तव्य आहे. पूरग्रस्तांना थोडासा दिलासा देण्यात आम्ही यशस्वी झालो, हाच आमच्यासाठी मोठा आनंद आहे.”

फाउंडेशनचे संचालक, कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी एकजुटीने केलेले हे कार्य पूरग्रस्तांसाठी मोठा आधार ठरले आहे.मानवतेचा खरा अर्थ आपत्तीच्या काळात दिसतो. पांडुरंग (आण्णा) पाटील फाउंडेशनचे हे कार्य समाजसेवेचे उत्तम उदाहरण ठरले असून, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनीही अशा संस्थांकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.