Breaking

Saturday, October 4, 2025

“पूरग्रस्त मुलांचे भविष्य वाचवा” – पांडुरंग (आण्णा) पाटील फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


यंदा व पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क पूर्णपणे माफ करावे : सौ. पल्लवीताई पाटील

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

राज्यातील अनेक भागांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, मोहोळ व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील सीना नदीकाठीच्या गावांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्यही धोक्यात आले आहे.

पूरग्रस्त गावांतील पालकांवर आधीच उपजीविकेचे संकट कोसळलेले असताना मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पांडुरंग (आण्णा) पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पल्लवी सूर्यकांत पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे यंदाचे व पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क पूर्णपणे माफ करावे अशी मागणी केली आहे.

सौ.पल्लवीताई पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे की,पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवणे हीच खरी पुनर्वसनाची प्रक्रिया ठरेल.पालकांकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत, त्यामुळे शुल्क भरणे शक्य नाही.शुल्क माफी दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल.

“विद्यार्थी हेच आपल्या देशाचे भवितव्य असून, त्यांच्या शिक्षणासाठी शासनाने तातडीने शुल्क माफीचा निर्णय घ्यावा,” अशी ठाम मागणी पांडुरंग (आण्णा) पाटील फाउंडेशनने केली आहे.