सह्याद्री फाउंडेशन व श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वावलंबनाचा उपक्रम
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
गंगेवाडी (ता.द सोलापूर) येथे ग्रामविकास आणि ग्रामीण युवकांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सह्याद्री फाउंडेशन आणि श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुक्कुटपालन, शेळीपालन, पशुसंवर्धन व शिवणकाम या विषयांवरील प्रशिक्षण शिबिर नुकतेच गंगेवाडी येथे यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजीभाऊ खंडागळे, ग्रामपंचायत सरपंच प्रशांत जाधव, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावातील युवक-युवतींना शेतीपूरक व्यवसायाची माहिती, पशुपालन व शिवणकाम यातील नवनवीन तंत्रज्ञान, तसेच स्वावलंबनाचे धडे देण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी नेताजीभाऊ खंडागळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे मोठे साधन म्हणजे शेतीपूरक व्यवसाय. गावातील तरुणांनी सरकारी योजना आणि प्रशिक्षणांचा लाभ घेत स्वबळावर उभे राहणे गरजेचे आहे. सह्याद्री फाउंडेशन अशा उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक गावात स्वावलंबनाची चळवळ उभी करेल.”
प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांनी मिळवलेले प्रमाणपत्र त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले असून, अनेकांनी या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करून समारोप करण्यात आला.
अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगार, आत्मनिर्भरता आणि सामाजिक प्रगतीचा मार्ग उपलब्ध होत आहे. सह्याद्री फाउंडेशन आणि श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गंगेवाडी हे गाव “स्वावलंबी गाव” या दिशेने वाटचाल करत आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.




