टेंभुर्णीतील समीर नाईकनवरे, महेश धोत्रे व अजय कांबळे यांचा प्रामाणिकपणाचा आदर्श
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
प्रामाणिकतेचा उत्तम आदर्श घालत टेंभुर्णी येथील तीन तरुणांनी २५ हजार रुपये किमतीचा हरवलेला मोबाईल सापडताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जमा केला. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.श्री.दत्तू तुकाराम पन्हाळकर, राहणार टेंभुर्णी, हे दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अकलूज चौकात गेले असता त्यांचा ओपो कंपनीचा मोबाईल (किंमत सुमारे ₹२५,०००) कुठेतरी पडून हरवला. घरी गेल्यावर मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व ठिकाणी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.दरम्यान, सायंकाळी सुमारास समीर नाईकनवरे व महेश धोत्रे (दोघेही टेंभुर्णी) तसेच अजय कांबळे (रा. तांबवे, ता. माढा) या युवकांना अकलूज चौक परिसरात मोबाईल सापडला. त्यांनी कोणतेही लोभ न ठेवता तत्काळ टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केला.
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मोबाईलवरील माहितीच्या आधारे पन्हाळकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर प्रामाणिक युवकांच्या उपस्थितीत त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.या प्रसंगी श्री. दत्तू पन्हाळकर यांनी तिन्ही युवकांचे मन:पूर्वक आभार मानले. नागरिकांनी अशा प्रामाणिक तरुणांचे कौतुक करावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.



