मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
रोपळे खुर्द (ता. माढा) — येथे आयोजित पालक सभेत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित पालकांना भावुक केले.
“शिक्षण हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून समाजाला नवी दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे. मुलांच्या चुकांवर पांघरूण घालू नका, तर त्यांच्या घडणीत जबाबदारीने सहभागी व्हा,” असे प्रतिपादन केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी केले.
काळे पुढे म्हणाले, “माणसाची प्रगती आणि उन्नती ही शिक्षणावर अवलंबून असते. घराला आधार व गावाला भूषण वाटावा असा नागरिक घडवायचा असेल, तर पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मुलं चुकीच्या वाटेला जाऊ नयेत, यासाठी पालकांनी सजग राहावे. शाळेचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. आम्ही शिक्षक म्हणून शिक्षण देण्यात कुठेही कमी पडणार नाही.
”शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा त्रिसूत्री संगमच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया असल्याचेही काळे यांनी नमूद केले.
या प्रसंगी पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक विठोबा गाडेकर हे कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि शाळेला समर्पित आहेत. शिक्षक दिगंबर देवकर व आगरकर मॅडम यांच्या मेहनतीमुळे शाळेला नवी गती मिळाली आहे.”
दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी आरती पाटील, तर उपाध्यक्षपदी पंढरीनाथ नाईकवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विठोबा गाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिगंबर देवकर यांनी मानले. गावातील सर्व पालक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते.




