“शिक्षणातून संस्कार — संस्कारातून समाज” : शैक्षणिक गुणवत्तेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचा दृढ संकल्प
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
मुलांच्या ठायी रुजलेले वाईट विचार काढायचे असतील तर चांगल्या विचारांचे बीजारोपण करावे लागते.हे चांगले विचार शिक्षणातूनच रुजतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवत त्यांच्या सुसंस्कारासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या विशेष बैठकीत पालकांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळा आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने नवे प्रयोग करत आहेत.विद्यार्थ्यांचे भविष्य या शाळांमधून घडत आहे आणि हे शिक्षण अधिक गतिमान, प्रगत व प्रेरणादायी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
काळे सर पुढे म्हणाले, “स्पर्धा परीक्षा तयारी, दर्जेदार इंग्रजी शिक्षण, कलागुणांना वाव देणारे उपक्रम, ‘निपुण भारत – निपुण महाराष्ट्र’ अध्ययन निष्पत्ती, उपचारात्मक अध्यापन अशा विविध उपक्रमांद्वारे प्रज्ञावंत आणि जबाबदार नागरिक घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत.”या प्रसंगी पालक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाची सुरुवात माय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.प्रास्ताविक बाबरवस्ती शाळेचे मुख्याध्यापक गणेश पवार व केदारवस्ती शाळेचे मुख्याध्यापक विष्णू शेंडगे यांनी केले.आभार प्रदर्शन बाबरवस्तीचे सचिन पवार व केदारवस्तीच्या राजश्री पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते, यावेळी पालकांनी शिक्षणातील नव्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले व शाळेच्या उन्नतीसाठी हातभार लावण्याचे आश्वासन दिले.





