Breaking

Tuesday, October 21, 2025

पांडुरंग (आण्णा) पाटील फाउंडेशनचा उपक्रम – समाजातील खऱ्या देवींचा आणि निडर पत्रकारांचा गौरव


‘नवदुर्गा सन्मान’ आणि ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

मुख्य संपादक - संतोष पांढरे (मोडनिंब)

होळे (ता. माढा) येथे पांडुरंग (आण्णा) पाटील फाउंडेशनतर्फे समाजातील महिला शक्ती व पत्रकारितेतील निडर कार्याचा गौरव करणारा ‘नवदुर्गा सन्मान व उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान २०२५’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी, प्रेरणादायी कार्य आणि प्रामाणिक पत्रकारितेचा संगम ठरला.


या सोहळ्यात होळे व वरवडे गावातील त्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला, ज्यांनी आपल्या परिश्रमातून कुटुंबाचा उद्धार केला, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि संस्कार यासाठी झटून कार्य केले.अन्यायाशी लढणाऱ्या दुर्गा, सुसंस्कार देणाऱ्या सरस्वती आणि प्रेम, माया, ममता टिकवणाऱ्या लक्ष्मी अशा या खऱ्या देवींच्या रूपातील महिलांना ‘जिजाऊ, सावित्री, अहिल्या आणि रमाई पुरस्कार २०२५’ ने गौरविण्यात आले.

त्याचबरोबर पत्रकारितेच्या क्षेत्रात निष्पक्षता, निडरपणा आणि सामाजिक भान जपणाऱ्या पत्रकारांना ‘उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान २०२५’ ने गौरविण्यात आले.जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या पत्रकारांचे योगदान फाउंडेशनतर्फे विशेष मान्यतेस पात्र ठरले.

कार्यक्रमात फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पल्लवीताई पाटील यांनी नवदुर्गांच्या कार्याचे कौतुक करताना महिलांच्या आत्मविश्वासाचे व त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी उमाविद्यालयाचे माजी प्राचार्य अशोक पाटील सर, माजी बालकल्याण सभापती सौ.नंदाताई सुर्वे, तसेच होळे व वरवडे येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ व सत्कारमूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.