गुन्हेगारी पासून दूर,स्वावलंबनाकडे वाटचाल- 'पहाट' उपक्रम पारधी समाजासाठी ठरतोय नवजीवनाचा किरण
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या मार्फत सुरू असलेल्या ‘पहाट’ या सामाजिक परिवर्तन उपक्रमांतर्गत, माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील पारधी समाजातील ८६ कुटुंबांना दीपावलीनिमित्त रेशन किट, साडी-कपडे आणि ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचा मुख्य हेतू पारधी समाजाला गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर ठेवून मुख्य प्रवाहात आणणे, तसेच त्यांना स्वावलंबी बनविणे हा आहे. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पोलीस अधीक्षकांनी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विविध योजनांची माहिती देऊन, शासकीय आणि खाजगी उद्योग व नोकऱ्यांच्या संधींशी त्यांचा संपर्क वाढविण्याचे प्रयत्न हाती घेतले आहेत.
टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी वस्त्यांवर भेटी देऊन, शिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींची यादी तयार करणे, त्यांना रोजगार मार्गदर्शन देणे आणि स्वयंरोजगारासाठी उद्योग सुरू करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी हा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. पुढील काळात भिमानगर, बेंबळे, दहिवली, आणि टेंभुर्णी येथील पारधी समाजातील कुटुंबांना उद्योग, प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




