Breaking

Saturday, November 1, 2025

लोकमंगल शुगर भंडारकवठे कारखान्याचा १९ वा गाळप हंगाम उत्साहात संपन्न


विक्रमी १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट; शेतकरी-कारखाना नातं अतूट -चेअरमन महेश देशमुख

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

लोकमंगल शुगर फॅक्टरी, भंडारकवठे या सुप्रसिद्ध साखर उद्योगाच्या १९ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी धार्मिक वातावरणात, ग्रामदैवत पिरमहासिद्ध देवस्थानाचे मुख्य पुरोहित यांच्या मंगल पूजन विधीने आणि कारखान्याचे चेअरमन मा. श्री. महेश देशमुख तसेच संचालक मा. श्री. पराग पाटील यांच्या शुभहस्ते झाला.

या प्रसंगी चेअरमन महेश देशमुख यांनी शेतकरी बांधवांना संबोधित करताना सांगितले की, “लोकमंगल शुगर यंदाच्या गाळप हंगामात सर्व मागील विक्रमांना मागे टाकत विक्रमी १० लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा निर्धार करून सज्ज झाली आहे. कारखान्याची सर्व यंत्रसामग्री दुरुस्ती, देखभाल आणि उत्पादन क्षमता वाढविण्याची कामे वेळेत पूर्ण झाली असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणाही सज्ज आहे. पंचक्रोशीतील ऊस उत्पादकांचा अपार विश्वास आणि निष्ठा लक्षात घेता, हा हंगाम सर्वार्थाने ऐतिहासिक ठरेल.”

देशमुख पुढे म्हणाले की, “लोकमंगल आणि शेतकरी बांधव यांच्यातील नाते हे फक्त आर्थिक व्यवहाराचे नसून भावनिक आणि विश्वासाचे आहे. ऊस दोन दिवस उशिरा का होईना, पण आपला ऊस लोकमंगललाच द्यायचा-असा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात आहे. हा विश्वास आमच्यासाठी सर्वात मोठा भांडवल असून, याच नात्याच्या बळावर लोकमंगल प्रगतीचा प्रवास सतत सुरू ठेवत आहे.”

या शुभारंभ कार्यक्रमास भंडारकवठे ग्रामपंचायतीचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, हणमंत पुजारी, मायाप्पा जंगलगी, सोमेश्वर बबलेश्वर, सोमशेखर पाटील, तसेच पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय कारखान्याचे सरव्यवस्थापक गुणासेकरण, तांत्रिक सरव्यवस्थापक गजराज रुद्रमठ, सहायक सरव्यवस्थापक दीपक नलावडे, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, ऊस तोडणी ठेकेदार आणि कामगार यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याच्या जनसंपर्क विभागाने केले तर उपस्थित मान्यवरांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित शेतकऱ्यांनीही लोकमंगल शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास व्यक्त करत “लोकमंगल हे आमचे स्वतःचे घर आहे” अशी भावना मांडली.

लोकमंगल शुगरच्या व्यवस्थापनाने हंगामातील सर्व सुरक्षा, तांत्रिक व प्रशासनिक बाबींना प्राधान्य देत शेतकरी हित जोपासण्याचा निर्धार व्यक्त केला