Breaking

Saturday, November 8, 2025

✨ मोडनिंबमध्ये सिद्धचक्र महामंडल विधानाचा भक्तीमय सोहळा संपन्न


क्षपकराज सुवर्णा किरण शहा यांच्या स्मरणार्थ राहुल शहा परिवारातर्फे आयोजन - श्रद्धा, संस्कार आणि भक्तीचा अदभूत मिलाफ

📍 मुख्य संपादक : संतोष पांढरे ( मोडनिंब )

मोडनिंब या पवित्र भूमीवर गेल्या आठ दिवसांपासून श्रद्धा, भक्ती आणि संस्कारांचा अखंड प्रवाह वाहत होता. क्षपकराज सुवर्णा किरण शहा यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ धर्मानुरागी श्री राहुल किरण शहा व परिवार यांच्या पुढाकारातून सिद्धचक्र महामंडल विधान हा अत्यंत भक्तिमय सोहळा मोडनिंब येथे २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मोठ्या श्रद्धेने पार पडला.या धार्मिक सोहळ्यात सकल जैन समाजाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. गावातील मंदिरे, रस्ते, घराघरांतून शांतिमंत्रांचे स्वर गुंजत राहिले आणि संपूर्ण मोडनिंब भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

सोहळ्याची सुरुवात २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहणाचे सौभाग्य श्री राहुल गांधी परिवार, श्री सुकुमार शहा परिवार आणि श्री सुजित कोठारी (दौंड) यांच्या हस्ते लाभले. विधान मंडपाचे उद्घाटन श्री सतिश हुकुमचंद शहा व परिवार यांच्या हस्ते झाले.



प्रत्येक दिवस धार्मिक विधी, स्तोत्र पठण, भक्तिप्रधान संगीत आणि शांतिमंत्रांच्या बोल्यांनी रंगलेला होता. श्री व सौ. राहुल शहा, श्री व सौ. पोपट दोभाडा, श्री व सौ. संकल्प शहा यांनी इंद्र-इंद्रायणी, श्री व सौ. किशोर गांधी यांनी धनपती-कुबेर, तर श्री व सौ. मनोज शहा यांनी श्रीपालराज व मैना सुंदरी या पात्रांचा मान स्वीकारून विधानाची शोभा अधिक वाढवली.या विधीमागे केवळ परंपरा नव्हती, तर प्रत्येकाच्या मनात “सेवा हीच साधना” ही भावना होती.सिद्धचक्र विधानासोबतच सखुबाई रामचंद ट्रस्ट १००८ व आदिनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्या नव्या सांस्कृतिक हॉल आणि त्यागी निवासाच्या बांधकामासाठी अनेक दानशूर दात्यांनी उदार देणग्या दिल्या.या दानशूर व्यक्तींमध्ये श्री सुहिल शहा, श्री अरविंद शहा, श्री पोपटलाल दोभाडा, श्री सुकुमार शहा, श्री राहुल शहा, श्री दिलीप शहा, श्री राहुल गांधी, श्री नवजीवन शहा, श्री प्रफुल्ल शहा आदींचा मोलाचा सहभाग राहिला. बोअरवेलसाठी आवश्यक साहित्य श्री क्षितीन शहा यांनी दान दिले.या देणग्या केवळ आर्थिक नव्हत्या;त्या श्रद्धा आणि समाजासाठी असलेल्या जबाबदारीच्या प्रतीक होत्या.

या सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर झालेली ‘मैना सुंदरी’ ही जीवनप्रसंगावर आधारित नाटिका सर्वांच्या मनाला भिडली. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या या नाटिकेने भक्तांमध्ये एक नवीन प्रेरणा निर्माण केली. जैन तत्त्वज्ञानातील त्याग, साधना आणि संयम यांचा संदेश या नाटिकेतून प्रभावीपणे पोहोचला.

संपूर्ण विधान सोहळ्याचे मार्गदर्शन संभाजीनगर येथील बा. ब्र. विकास भैय्या यांनी केले, तर धार्मिक विधींचे संचालन स्थानिक पंडित प्रितम शहा यांनी केले. त्यांचे शांत, संयमी आणि विद्वत्तापूर्ण मार्गदर्शन हा या कार्यक्रमाचा आत्मा ठरला.




आठ दिवसीय भक्तिमय सोहळ्याची सांगता ६ नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणुकीने झाली. ढोल-ताशांचा निनाद, पुष्पवृष्टी, जयजयकारांचा गजर आणि मंगलध्वनींनी मोडनिंबच्या प्रत्येक गल्लीला भक्तीने भारावून टाकले.दान, धर्म, भक्ती आणि संस्कार यांचा संगम घडविणारा हा सिद्धचक्र महामंडल विधानाचा सोहळा मोडनिंबच्या धार्मिक इतिहासात एक तेजस्वी अध्याय ठरला. प्रत्येकाच्या मनात अध्यात्मिक आनंदाचा आणि समाजबंधाच्या शक्तीचा नवसंचार झाला.

मोडनिंबच्या या भक्तीमय अध्यायाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली-“जिथे श्रद्धा, सेवा आणि एकता असते, तिथेच परमात्म्याची खरी उपस्थिती असते.”