Breaking

Tuesday, November 11, 2025

मतदार याद्या ग्रामपंचायतीत लावा


शेतकरी व शेतमजूर वर्गाला अडचणी ; माढा तालुक्यातील नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

मुख्य संपादक : संतोष पांढरे

येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार असून निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करून प्रसिद्ध केल्या आहेत.सध्या या मतदार याद्या तहसील कार्यालयात पाहता येत जरी असल्या तरी मात्र ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर वर्गाला तहसील कार्यालयात जाणे शक्य नसल्याने अनेकांना आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासणे कठीण ठरत आहे.निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थाने लोकसहभाग वाढवायचा असेल, तर मतदार याद्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावल्या जाव्यात, अशी मागणी माढा तालुक्यातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. ग्रामपंचायत हे स्थानिक प्रशासनाचे सर्वात जवळचे केंद्र असल्याने, यादी ग्रामपंचायतीत लावल्यास मतदारांना आपले नाव तपासणे, दुरुस्ती करणे किंवा नवीन नोंदणीबाबत तपासणी व चौकशी करणे अधिक सोयीस्कर होईल, असे नागरिकांचे मत आहे.

“मतदान हा लोकशाहीचा पाया आहे. परंतु मतदार यादीत नावच नसेल तर मतदानाचा हक्कच हिरावला जातो. त्यामुळे मतदार याद्या गावांमध्ये सर्वांसाठी खुलेपणाने लावल्या गेल्या पाहिजेत,” असे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील मतदारांना तहसील कार्यालयापर्यंत जाणे आर्थिकदृष्ट्या व वेळेअभावी कठीण ठरते. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने मतदार याद्या सार्वजनिक ठिकाणी लावाव्यात आणि त्याची सूचना गावात सर्वत्र द्यावी, अशी एकमुखी मागणी माढा तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.