ई-लर्निंग किट व संगणक संचामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानयात्रेला नवी उंची
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
सोलंकरवाडी (ता. माढा) शाळेच्या प्रगतीपथावर आज एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण नोंदवला गेला. “बदलाप्रमाणे स्वतःला परावर्तित करून घेतो तोच समाजामध्ये पुढे जातो” या विचारांचा स्वीकार करत रोटरी क्लब ऑफ मोडनिंब यांनी शाळेस ई–लर्निंग किट आणि संगणक संच भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला आधुनिकतेची नवी पातळी लाभवून दिली.मोडनिंब व पंचक्रोशीत सामाजिक भान, जबाबदारी आणि लोककल्याणाची परंपरा जपणाऱ्या रोटरी क्लबने पुन्हा एकदा ग्रामीण शिक्षणासाठी आपला संवेदनशील हात पुढे केला. डिजिटल युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनीही ज्ञानाच्या स्पर्धेत समान पायरीवर उभे राहावे, त्यांना आधुनिक साधनांचा वापर करता यावा याच हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले.आजच्या भेटीतून गावातील मुलांना नवीन तंत्रज्ञानाचा, ऑनलाइन शिक्षण साधनांचा आणि प्रगत शैक्षणिक साधनांचा उपयोग करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. हे केवळ उपकरण नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानयात्रेत एक प्रकाशमान ठिणगी आहे, जी त्यांचे भविष्य उजळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.रोटरी क्लब ऑफ मोडनिंबचा हा पहिलाच उपक्रम नाही. यापूर्वीही शाळेतील आदर्श शिक्षकांचा सन्मान करून, विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीस बळ देण्यासाठी वाचनालयासाठी कपाट आणि पुस्तक संच भेट देण्यात आला होता. हीच सातत्यपूर्ण कृतज्ञतेची परंपरा आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या रूपाने पुढे नेण्यात आली.सोलंकरवाडी ग्रामस्थांनी या कार्याबद्दल रोटरी क्लबचे मनःपूर्वक आभार मानले व सामाजिक कार्याची ही साखळी कायम राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश गिडडे, सचिव डॉ. संतोष दळवी, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत कोल्हे, मार्गदर्शक डॉ. गोळवलकर, डॉ. वागज, औदुंबर पाटील यांच्यासह सर्व रोटरीयन उपस्थित होते.ग्रामस्थांच्या वतीने राजाभाऊ भांगिरे आणि शहाजी यादव यांनी शाळेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे कौतुक करत रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमात निलेश मोरे, ज्योतीताई कुलकर्णी, योगेश पाटील, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अतुल माळी आणि सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी
रोटरीचे सचिव डॉ. संतोष दळवी यांनी सांगितले की, "कला, क्रीडा, सांस्कृतिक विभाग आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सोलंकरवाडीची शाळा सातत्याने कामगिरी करत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय आहे."
कार्यक्रमात तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरला.रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमांतून सोलंकरवाडी शाळेला डिजिटल शिक्षणाची मजबूत पायाभरणी मिळाली आहे. ही भेट विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवीन दिशा देईल आणि त्यांना आधुनिक शिक्षणाच्या स्पर्धेत समर्थ बनवेल, अशी ग्रामस्थांची भावना आहे.रोटरी क्लबच्या या योगदानामुळे सोलंकरवाडीचा प्रगतीकडे जाणारा प्रवास आता अधिक वेगाने पुढे सरकणार हे निश्चितच.



