Breaking

Saturday, November 22, 2025

" निपुण माता म्हणजेच निपुण भारताची पायाभरणी ” — दिगंबर काळे


उपळाई बु. व रोपळे खुर्द उत्सवात शिक्षक-माता-विद्यार्थी तिन्ही घटकांचा सुंदर मेळ


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)


“निपुण माता म्हणजेच निपुण भारताची पायाभरणी,” अशा शब्दांत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी निपुण उत्सवाच्या माध्यमातून मातांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. निपुण भारत अभियानांतर्गत उपळाई बु. आणि रोपळे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित निपुण उत्सवामध्ये शिक्षक–माता–विद्यार्थी या तिन्ही घटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

काळे म्हणाले, “मुलांच्या शिक्षणप्रक्रियेत आईची भूमिका ही सर्वात संवेदनशील आणि प्रभावी असते. बदलत्या शिक्षणपद्धतीत कृती-आधारित शिक्षण आणि मुलांसोबत सुसंवाद वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माता जर सहभागितेने पुढे आल्या, आयडिया व्हिडिओ पाहून त्यातील खेळ–कृती मुलांसोबत केल्या तर मुलांच्या शिकण्याचा दर्जा निश्चितच उंचावेल. शिक्षणाची भीती दूर होऊन एक सुदृढ आणि आत्मविश्वासू विद्यार्थी घडेल.”

उपळाई बु. आणि रोपळे खुर्द येथील कार्यक्रमात उपस्थित मातांनी अनुभवकथन, संवाद, शैक्षणिक टिप्स यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. मातांनी मुलांच्या दैनंदिन शिक्षणातील बदल, अडचणी, आनंदाचे प्रसंग मनमोकळेपणाने मांडले. त्यांच्या सहभागातून शाळा आणि घरातील शिकण्यातील एकात्मता अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट झाले.कार्यक्रमात मुख्याध्यापक विठोबा गाडेकर, माधुरी वागज, ज्योती घाटूळे यांनी मातांना निपुण भारत उपक्रमाचे उद्दिष्ट, कौशल्याधारित शिकवण आणि बालकांच्या विकासातील कुटुंबाच्या भूमिकेचे मार्गदर्शन केले.

रोपळे खुर्द शाळेत झालेला एक क्षण सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला — “आम्हाला आरक्षण नको, पण संरक्षण पाहिजे ” या शब्दांत मातांनी शिक्षणाबरोबर सुरक्षिततेची जाणीव मांडली. शाळेकडून मातांना संपूर्ण विश्वास व आश्वासन देण्यात आले.शाळेचा स्टॉल आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृती पाहून प्रत्येक मातेच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि विश्वासाची चमक दिसून आली. शिक्षणातील सकारात्मक बदलाची ही जिवंत साक्ष होती.

कार्यक्रमाची सुरुवात माय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली.उपस्थितांचे स्वागत माधुरी वागज यांनी केले.सुत्रसंचालन विठोबा गाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन सुधीर गुंड यांनी केले.

निपुण उत्सवातून मातांचा आणि शिक्षकांचा एकत्रित सहभाग दिसून आला. “आई–शिक्षक–विद्यार्थी एका ध्येयासाठी एकत्र आले तर निपुण भारताचे स्वप्न साकार होण्यास अडथळाच राहणार नाही,” असा दृढ विश्वास केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केला.या उत्सवातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, कुटुंबाचा सहभाग आणि मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रभावी संदेश समाजासमोर ठेवला गेला.