मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गैरसोयींनी व्यथित होऊन, मोडनिंब बसस्थानकातील प्रवाशांच्या वेदना आणि प्रश्नांना न्याय मिळावा या हेतूने स्थानिक प्रवासी प्रदीप गिड्डे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिलेल्या निवेदनाद्वारे 1 डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.गिड्डे यांच्या मते, मोडनिंब बसस्थानक हे अनेक विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि प्रवाशांचे रोजच्या जीवनातील महत्त्वाचे केंद्र. परंतु सकाळच्या वेळेत एस.टी. बसेस थांबत नसणे, शिवशाही सेवा बंद असणे, कर्मचारी अनुपस्थित असणे, तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव या समस्या दीर्घकाळापासून दुर्लक्षितच राहिल्या आहेत.
“या बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरची अडचण मला दिसते. वारंवार तक्रारी करूनही काहीच बदल होत नसल्याने शांत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे,” असे गिड्डे यांनी निवेदनात नमूद केले आहे.25 नोव्हेंबर रोजीही त्यांनी लेखी तक्रार सादर केली होती. मात्र कोणतीही दखल न घेतल्याने, आता लोकांच्या हितासाठी आपल्या मनातील व्यथा उपोषणाद्वारे नोंदवण्याचा त्यांचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.उपोषणादरम्यान त्यांचे आरोग्य बिघडल्यास त्याची जबाबदारी महामंडळावर राहील, असे त्यांनी नम्रपणे स्पष्ट केले आहे.स्थानिक प्रवासी आणि नागरिकांनीही गिड्डे यांच्या निर्णयाला पाठिंबा व्यक्त करत तातडीने सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



